Tuesday, 14 September 2021

शेतकरी मित्राने नेमकं काय करावे?

शेतकरी मित्राने नेमकं काय करावे?

एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनातील निवृत्त उच्च पदस्थ अधिकारी मीत्रांनी सहजच विचारणा केली की मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फळ पिकांची बाग लागवड करावी का? 

सहजच हो किंवा नाही असे उत्तर तरी कसे देणार? कारण साहेब मीत्रच म्हणाले की एकरी 15 ते 20 टन माल निघेल. पंचतारांकित हॉटेल मधुन खुप मागणी आहे, दर पण रु 250 प्रती किलो मिळेल. म्हणजे दरवर्षी एकरी रु दहा ते वीस लाख होणार.

थोडा दचलोकच. साहेबांना नेमके कसे उत्तर द्यावे, हे मात्र कळलेच नाही. शेवटी कृषी क्षेत्रातील खुप मोठा ज्ञाणी असल्यासारखे कसे बसे हो, चांगली मॅनेजमेंट व मार्केट मिळाले तर नक्कीच असे मी बोलुन गेलो. 

नंतर मात्र मनामध्ये अनेक प्रश्नांनी थैमान घातले. कारणही तसेच होते. माझी आई स्वतःच एकटी दिवसभर एक दोन एकरात राबुन  भाजीपाला करायची व गावातील पेठेत व बाजार दिवशी विकुन संपुर्ण घर खर्च, बि-बियाणे, खते, औषधे, मजुर व आमचा सर्वांचा शिक्षणाचा व इतर खर्च भागवुन काही थोडी थोडी शिल्लक मातीच्या गाडग्यात ठेवत असे. थोडक्यात तिचे ठाम मत असे की, शेतीत खुप कष्ट आहेत पण परवडते, लई नाही पण चांगलं भागतय ना. खुश व समाधानी असायची. असो.

पुन्हा साहेबांच्या मुळ प्रश्न होता की ड्रॅगन फळबाग करावी का नाही?

मला पडलेला प्रश्न वेगळाच होता. थोडक्यात माझे वैयक्तिक मत. ड्रॅगन फळा बद्दल खुप काही चांगले गोष्टी आहेत. महत्वाचे म्हणजे पाणी कमी लागते. अर्थात, बारमाही पाणी पाहिजेच पाहिजे.

तोटा म्हणजे सर्व साधारण ग्राहकांच्या पसंतीस अजुन म्हणावे असे उतरले असेल का? तर माझे वैयक्तिक मत नकारात्मक आहे.

कधी कधी असा विचार येतो की शेतकरीच शेतकरयाला खोटे बोलतो का? फसवतो का?  

बहुतेक सर्वच नविन गोष्टीत काही मोजकेच सुरवातीला पैसे कमावून बसतात, खरं तर रोपे विकणारा. अर्थात, एकदा व्यवसाय करायचा म्हणजे नफा तर कोणीही पहाणारच ना!

शेतकरी मग तो कोणीही असो, मला वाटते त्याने भौगोलिक परीस्थिती, मालाची मागणी खप (मालाची पसंती), उपलब्ध पाणी, मणुष्यबळ, वाहतूक खर्च व इतर अनेक गोष्टीचा खुप व अनेक अंगाने विचार करायला पाहिजे, बहुतेकजण तसा नक्कीच विचार करीत असतील. तरी मला वाटते अनेकजण जाहीरातींच्या जगात ऐकीव, व  भंपक बातम्या वाचुन, पाहुन इतर कोणीतरी काहीतरी नवीन करतो आहे, त्यामध्ये खुप पैसा आहे व मग तोही परीस्थितीचा पुरेसा विचार न करता स्पर्धेत टिकण्यासाठी  दमछाक होईपर्यंत धावतो, कर्जबाजारी होतो, दुर्दैवाने जीवनयात्रा संपवतो. सर्व समाजाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक. 
 
आज पेरु, आंबा, सिताफळे, अंजीर, डाळींब, बोरं ई. अवरषणप्रवण क्षेत्रातील फळबाग शेतकरी यांची परीस्थिती काय आहे व कीती उन्नती झाली?.  काहीच झाली नाही असे मुळीच नाही. परंतु, दरवर्षी अपेक्षित एकरी रुपये व प्रत्यक्षात पाच किंवा दहा वर्षाची सरासरी यामध्ये प्रचंड तफावत आहे, असे माझे ठाम मत आहे. अर्थातच, अपेक्षित (किंवा जाहीरातीतुन केलेल्या दाव्यापेक्षा) खुप कमी रुपये हाती शिल्लक रहात असले पाहिजे.

मग शेतकरी वर्गाने ड्रॅगन किंवा तत्सम फळबाग करायचे का नाही ?

नक्कीच करायला हरकत नाही. परंतु सर्वांनाच रुपये दहा ते वीस लाख एकरी वगैरे काही अपवाद वगळता शक्य होत नसावी, हि वास्तवता असली पाहिजे. मग असेच स्ट्रॉबेरी पिके, ढोबळी मिरची, गॅलॉन वांगी ई. लाटा येवुन गेल्या. दोन एकरा मध्ये स्ट्रॉबेरी, ई. पिकात सुद्धा दहा ते वीस लाख झाले पाहिजे होते. सत्य हेच की ते झाले नसावेत.

शेवटी काय तर माझी आई चाळीस वर्षांपूर्वी दोन एकरात पारंपारिक भाजीपाला पिके घेवुन, स्वतःच कष्ट करुन, घरचेच बि-बियाणे वापरून, अल्पशा पाण्यावर व औषधांवर व खतांवर खर्च करुन, वाहतूक व मार्केट स्वतःच गावच्या बाजारात करुन समाधानी, आनंदी व अपेक्षित पेक्षाही चांगली सरासरी रुपये शिल्लक ठेवत असायची. 

नक्की काय होते आहे ते मात्र समजत नाही. अपेक्षांचं ओझं खुप मोठे झाले आहे का? का, खर्चाचं ओझं खुप मोठे झाले आहे का?